‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करावा, नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

0

मुंबई : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त करण्याची विनंती केली आहे.

या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकदेखील भावूक होत आहेत. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पंडितांच्या हत्याकांडावर आधारित हा चित्रपट राज्यातील जनतेला पाहता यावा, हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाच्या टीमची भेटी घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सोशल मीडियावरही सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 14-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here