कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची सिंधूरत्न योजना सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याला दरवर्षी ५० कोटी रुपये विशेष निधी मिळणार आहे. या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनांचा विकास करण्यात येणार आहे. रत्नागिरी तसेच कोकणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

रत्नागिरीच्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरण बांधकामाचा भूमीपूजन सोहळा सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, समक्ष येऊन भूमीपूजन करण्यास आवडले असते. मात्र, अधिवेशनामुळे येता आले नाही. इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करताना उत्साह वाटला पाहिजे, कामासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनाही इमारतीत आल्यावर चांगले वाटले पाहिजे, त्यासाठी ही इमारत हवेशीर, चांगला उजेड असणारी असावी. जिल्हा परिषदेची ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे व त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. ही इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असली पाहिजे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार म्हणून कोकणला भरभरून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या अर्थसंकल्पातही कोकणला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. रत्नागिरी ते गणपतीपुळे या सागरी मार्गावर जेटबोट, रत्नागिरी विमानतळ इमारत व भूसंपादनासाठी १०० कोटी, कोकणातील सर्वोकृष्ट क्रीडा संकुल रत्नागिरीत बांधण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटी निधी प्रस्तावित आहे. यासह विविध उपक्रमासाठीही निधी देण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

कोकणातील निसर्गाचे संवर्धन करून निर्सगपूरक उद्योग उभारायचे आहेत. सर्वांना सोबत घेऊनच कोकणचा विकास करीत आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी प्रस्ताविक केले. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. तिथे प्रशासक आले आहेत. जिल्हा परिषदेचीही मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहणार आहेत. त्यांनी चांगले काम केले पाहिजे. शासनात प्रशासनात काम करत असताना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी असे काम केले पाहिजे की, लोकांनी त्यांचे नाव काढले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 14-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here