गुहागर : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी विविध प्रथा व परंपरा देखील पाहावयास मिळतात. तालुक्यातील अडूर येथेही अनोखी परंपरा जपली जात आहे. सहाव्या होळीच्या दिवशी संकासूर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो. हा क्षण पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
फाल्गुन पंचमीच्या दुसऱ्या दिवशी अडूर गावाची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे भोवनीकरीता बाहेर पडतात. या अंतर्गत पाच गावे येतात. यामध्ये कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांचा समावेश होतो. या पाच गावातील भोवनी झाल्यावर पंचमीला रात्रीच्या वेळी अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळी खेळले जातात. यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातून अलोट गर्दी जमते. यावेळी दोन होळी पाहावयास मिळतात. यामध्ये पहिली होळी कोकड होळी ही स्थानिक पिंपळदेवाची तर दुसरी होळी ही छोटी होळी ग्रामदेवतेच्या मंदिरात मानाचे स्थान असणाऱ्या पड्यादेवाची असते. यावेळी होळीभोवती पाच फेऱ्या मारून संकासुराच्या हातून होम प्रज्वलित करण्यात येतो, अशी माहिती येथील स्थानिक दिनेश खेडेकर यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 16-Mar-22