‘संजय राऊत हे शरद पवारांचे एजंट, प्लॅनिंग करून शिवसेना-भाजपमध्ये फूट पाडली’

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे एजंट आहेत. राऊत यांनी अत्यंत योजनापूर्वक शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर निर्माण केले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

महाराष्ट्रात भाजपने राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष टोकाच्या पातळीला नेऊन ठेवला आहे. या सगळ्याची महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

त्यांनी म्हटले की, नवाब मलिक यांचा जामीन न्यायालयाने फेटाळूनही तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीत. मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर केंद्रीय पर्यावरण खात्याने कारवाई करूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. या सगळ्याचीही महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल, असा प्रतिहल्ला चंद्रकांत पाटील यांनी केला.

संजय राऊत यांनी राजभवनासंदर्भात केलेल्या टीकेवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. राज्यपालांचं स्थान हे सर्वोच्च असते. मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांनाही राज्यपालच शपथ देतात. त्यामुळे त्यांचे पद सर्वोच्च आहे. या पदाची स्वायतत्ता कायम राहिला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यपाल विधानसभेचं अध्यक्षपद भरून देत नाहीत. याचा अर्थ ते राजकारण करत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष सुरु आहे. पण भाजपने महाराष्ट्रात हा संघर्ष ज्या पातळीला नेऊन ठेवलाय, त्याची काळ्या अक्षरात नोंद होईल. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कायद्याचा भंग करण्याची भूमिका घेतली आहे. अशा व्यक्तीला पदावर ठेवून भाजप महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व आणीबाणीची आठवण करून देणारे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.

गोपीचंद पडळकर यांना विधानसभेच्या गेटवर अडवलं

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांना बुधवारी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. गोपीचंद पडळकर आज धनगराच्या वेशभूषेत आले होते. त्यामुळे त्यांना अडवण्यात आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला जागृत होण्याचे आवाहन केले. आम्ही आमची राजकीय शक्ती निर्माण करू. धनगर समाजाला आपल्या शक्तीची जाणीव झाली तर आपण शासनकर्ते होऊ शकतो, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 16-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here