स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार?

0

नागपूर : माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे.

या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्वाभिमानीची वाटचाल भाजपशी युती होण्याच्या दिशेने होऊ शकते.

राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांना विरोध करत आहेत. वीज मिळावी या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोको करत राज्य सरकारचा निषेध केला होता. शिवाय कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? अशी जहरी टीकाही केली होती. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वरुड-मोर्शी मतदारसंघाचे ‘स्वाभिमानी’चे एकमेव आमदार देवेंद्र भुयार निवडून आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाही. 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे वरुड-मोर्शीतील हिवरखेड इथे सभा घेणार आहेत. सभेच्या पोस्टरवर देवेंद्र भुयार यांचे नाव नाही आणि त्यांना सभेचे निमंत्रण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे 24 मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर आमदार भुयारांच्या मतदारसंघात काय तोफ डागतात याकडे लक्ष लागलं आहे.

सत्तेतून बाहेर पडण्याची ही असू शकतात कारणे:
• दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी 14 दिवस कोल्हापूरला धरणे आंदोलनाला बसले पण सरकारने विशेष दखल घेतली नाही, हे राजू शेट्टींच्या जिव्हारी लागले.
• केंद्र सरकारने भूसंपादनाला पाच पट मोबदल्याचा कायदा दोन पटीवर आणला आहे.
• कर्जमाफी, पीकविमा, दिवसा वीज या मुद्द्यावर बाहेर पडू शकतात. ऊस उत्पादकांच्या एफआरपीचे राज्य सरकारने तुकडे केले.
• शरद पवार यांच्यासोबत जाण्याने राजू शेट्टींचा पराभव झाला, जनमत विरोधात गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
• स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांसोबत हातमिळवणी केलेली लोकांना आवडली नाही.
• केंद्र सरकारविरोधी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात राजू शेट्टीचा सक्रीय सहभाग नव्हता. मग भाजपाशी आतून संपर्कात होते का? असाही सवाल विचारला जातोय
• भाजपालाही स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत हवी आहे.
• ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची आणि भाजपची गोपनीय बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
• राजू शेट्टी यांच्याकडून वारंवार महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे.
• भविष्यात ‘स्वाभिमानी’ भाजप सोबत गेल्यास राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविंकात तुपकर एकाच व्यासपीठावर दिसल्यास नवल वाटू नये.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 16-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here