यंदाची आयपीएल प्रेक्षकांविनाच होणार…?

0

भारतामध्येही कोरोना व्हायरसने प्रवेश केल्यामुळे जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेली आयपीएल संकटात सापडली आहे. त्यातच आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयपीएलबाबत बीसीसीआयला महत्त्वाची सूचना केली आहे. देशामध्ये कोणत्याही स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर ते बंद दाराआड करा, असं क्रीडा मंत्रालयाने सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करायचं असेल, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय मॅचचं आयोजन करावं लागेल. स्पर्धा बंद दरवाजाआड कराव्यात आणि प्रेक्षक हे सामने पाहायला येऊ नयेत याची काळजी घ्यावी, असं क्रीडा सचिव राध्येशाम जुलानिया यांनी सांगितलं. क्रीडा सचिव राध्येशाम जुलानिया म्हणाले, ‘बीसीसीआयसह सगळ्याच राष्ट्रीय संघांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना, नियम आणि सल्ल्याचं पालन करायला सांगितलं आहे. सार्वजनिक सभांपासून जपण्याचा सल्लाही आम्ही दिला आहे. जर एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर मोकळ्या स्टेडियममध्ये करा. पण यासाठी बीसीसीआयला राज्य सरकारचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही केंद्र सरकारच्या या आदेशावर भाष्य केलं आहे. ‘बीसीसीआय खेळ, खेळाडू, प्रेक्षक आणि लीगचं हीत लक्षात घेऊन योग्य पाऊल उचलेल. परिस्थिती जलद बदलत आहे आणि बोर्डाचं यावर नियंत्रण नाही. आयपीएल कार्यकारी परिषदेची बैठक शनिवारी मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारने दिलेला आदेश लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागेल,’ असं बीसीसीआय अधिकारी म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आयपीएल प्रेक्षकांशिवाय खेळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला आहे. तसंच आयपीएलच्या सामन्यांसाठीची तिकीटविक्री न करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here