पत्रकार रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळवून देणाऱ्या निर्भीड पत्रकारितेबद्दल 2019चा “रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ प्रसिद्ध भारतीय पत्रकार रवीश कुमार यांना जाहीर झाला आहे. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडमधील मानवी हक्क कार्यकर्त्या अंगखाना नीलापजित, फिलिपिन्समधील संगीतकार रेमुंडो पुजांते कायाबयाब आणि दक्षिण कोरियामध्ये तरुणांमधील हिंसा आणि मानसिक आरोग्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किम जोंग-की यांना यंदाच्या “रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. आशियातील नोबेल मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे 9 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होईल. यंदा हा पुरस्कार पाच जणांना देण्यात येणार असून, त्या रवीश कुमार हे एकमेव भारतीय आहेत. 

एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक असलेले 44 वर्षीय रवीश कुमार यांचा भारतातील सर्वांधिक प्रभावशाली पत्रकारांमध्ये समावेश होतो, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. आपल्या “प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे सर्वसामान्यांच्या दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम ते करतात. ज्यांचा आवाज दाबला जातो, अशा घटकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोचविण्याचे काम रवीश कुमार यांची पत्रकारिता करते. लोकांचा आवाज बनणे हीच पत्रकारिता आहे, अशा शब्दांत पुरस्कार निवड समितीने रवीश कुमार यांचा गौरव केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here