राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पाटबंधारे वसाहतीजवळील समाज कल्याण विभागाच्या मुले व मुलींच्या शासकीय वसतीगृहाला अचानक भेट दिली. यावेळी येथील जेवणाचा दर्जा व स्वयंपाकगृहाची दुरवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त करीत येथील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. वसतीगृहातील निवास व्यवस्था, खोल्या व परिसर स्वच्छता, स्वयंपाक गृह, जेवणाचा दर्जा, पाण्याची व्यवस्था आणि विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागत असल्याचे ना. सामंत यांच्या दृष्टीस पडले. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे मी कधीही कोणत्याही दिवशी वसतीगृहाला भेट देईन, त्यावेळी जेवणाचा दर्जा व अन्य सुविधांबाबत सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी वसतीगृहातील मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून कोणतीही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ना. सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम समिती सदस्य बाबूशेठ म्हाप त्यांच्यासोबत होते.
