राजापूर : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि भारतात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसचा तालुक्यात फैलाव होऊ नये, म्हणून तालुक्यात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या-त्या ठिकाणचे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका गृहभेटी देऊन सर्वेक्षणही करीत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या सल्ल्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यासह गृहभेटींच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील गावांमध्ये तेथील कर्मचारी, आशा स्वयंसेविका लोकांशी संवाद साधून जनजागृती करत आहेत.
