महाविकास आघाडीच्या तरुण नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात

0

मुंबई : आताच्या घडीला राज्यातील राजकारणात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरू असून, ते सध्या अटकेत आहेत.

या एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तरुण नेते, आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार खडाजंगी रंगल्याचे दिसत आहे. अपेक्षेनुसार वादळी ठरत असलेल्या या अधिवेशात सहभागी होण्यासाठी बहुतांश आमदार उपस्थित आहेत. यातच महाविकास आघाडीतील तरुण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली.

रोहित पवार यांनी आमदारांनी भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सहकारी आमदारांसोबत आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. व्यस्त दिनक्रमातूनही साहेबांनी पुरेसा वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, याबाबत साहेबांचे आभार!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक यांचा समावेश होता. त्यांनी शरद पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांना राजकीय अनुभवाच्या आधारावर मार्गदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. राजकारणात येणारा प्रत्येक दिवस आव्हानात्मक असतो, असे सांगत प्रत्येक आमदाराकडून मतदार संघातले राजकीय हालहवाल विचारून घेतल्याचे समजते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 17-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here