स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडी मधून बाहेर पडणार?; संजय राऊत म्हणतात..

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकासआघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याच नाराजीतून राजू शेट्टी महाविकासआघाडीतून बाहेर पडतील, असेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांना राजू शेट्टी महाविकासआघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही. ते शेतकरी नेते आहेत, आंदोलन करत असतात. राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहू. काही निर्णय हे केंद्र सरकार घेते. त्यामुळे या प्रश्नांवर केंद्र सरकारकडे दाद मागणे अधिक योग्य ठरेल, असे संजय राऊत यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.

संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. विधानसभा अध्यक्षपदाचा विषय इतका जटील होऊ देऊ नये. पण तो जटील केला जात आहे. हा निर्णय घटनात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यपालांना विधानसभा निवडणुकीबाबत केवळ कळवणे अपेक्षित आहे, त्यांच्या परवानगीची गरज नसते. पण महाविकासआघाडी सरकारकडे तेवढे सौजन्य असल्याने त्यांनी राज्यपालांकडे निवडणुकीसाठी रितसर परवानगी मागितली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राजू शेट्टी ठाकरे सरकारवर नाराज का?

येत्या ५ एप्रिल रोजी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून त्यामध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची साथ सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्येही संघटना सहभागी झाली. सरकारला दोन वर्षे झाली तरी संघटनेला निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान दिले जात नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे सर्वच नेते नाराज आहेत. वीज पुरवठा, महापूर नुकसान भरपाई, पीक विमा, प्रोत्साहन अनुदान यासह काही मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी वाढत आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांच्याकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले जात आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 18-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here