मालवण: ट्रॉलरवरील इंजिनच्या कॅनमधील पाणी काढत असताना सुरेश गुणाजी लाखन या खलाश्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मेढा येथील यशवंत नारायण खांदारे यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. सुरेश लाखन हा विश्वविनायक ट्रॉलरवर खलाशी म्हणून कामास होता. गुरुवारी सकाळी ट्रॉलरच्या इंजिन कॅनमध्ये पाणी घुसल्याने ते काढण्यास समुद्रात गेला असता पुन्हा वर आला नाही. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी समुद्रात उतरत त्याला बाहेर काढत तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास विलास टेंबुलकर करत आहेत.
