डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले

0

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शनिवारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर दोघे फरार झाले, अशी साक्ष या साक्षीदाराने नोंदविली.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोपनिश्चिती करण्यात आली. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या साफसफाई विभागातील कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष झाली. त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना ओळखले. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती.
घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफसफाई करीत होते. त्यांची महिला सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हायडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एकाला गोळ्या झाडताना व ती व्यक्ती खाली पडल्याचे पाहिले. गोळ्या झाडल्यानंतर दोघे तरुण पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. साक्षीदार डॉ. दाभोलकरांच्या जवळ गेले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार हे चित्तरंजन वाटिकेत साफसफाईसाठी निघून गेले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने ॲड. ओंकार नेवगी या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. पुढील सुनावणी २३ मार्चला आहे.

हा सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 21-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here