ऐन गणेशोत्सवात नगराध्यक्ष निवडणुकीचा बिगुल वाजणार

0

रत्नागिरी नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणुक ऐन गणेशोत्सवात होण्याची शक्यता आहे. निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश निवडणुक विभागाने दिले आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून यानंतर अवघ्या काही दिवसांत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते.

लोकनियुक्त नगराध्यक्ष राहुल पंडीत यांनी राजीनामा दिल्याने रत्नागिरी नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेचे राहूल पंडीत विजयी झाले होते. पक्षातील अंतर्गत धोरणानुसार राहूल पंडीत यांना पहील्या दोन वर्षांसाठीच नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी राहूल पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठवून नगराध्यक्ष पदाची सुत्रे उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडया साळवी यांच्याकडे सोपवण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल पंडीत यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. एप्रिल महिन्यात राहुल पंडीत यांनी राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

राहुल पंडीत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या पदासाठी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. परंतु, घेण्यात येणारी पोटनिवडणुक विधानसभेच्या आधी होणार की नंतर याबाबत संभ्रमावस्था आहे. परंतु, राज्यातील नगर परिषदांमध्ये रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणुक सप्टेंबर महिन्याच्या पहील्याच आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील रिक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीचाही यात समावेश आहे. यासाठी २० ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करणे, ३० ऑगस्ट रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द करणे आणि ३१ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिध्द होताच दोनच दिवसांत निवडणुक कार्यक्रम घोषित होऊ शकते. यामुळे ऐन गणपतीतच रत्नागिरी नगर परिषदेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रत जाहीर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here