केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा दिलासा; हायकोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

0

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचा वाद मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणात राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिशीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टानं आज दिले.

नीलम राणे आणि निलेश राणे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर आधी सुनावणी घेऊन निर्णय द्या. निर्णयानंतर तीन आठवड्यांपर्यंत कारवाई करू नका, असे निर्देश कोर्टाने पालिकेला दिले आहेत. या तीन आठवड्यांत राणेंना पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.

जुहू येथील अधीश बंगल्यात कथितरित्या बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोप आहे. नारायण राणे यांच्या पत्नी नीलम व चिरंजीव निलेश हे संचालक असलेल्या आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कालका इस्टेट्समध्ये १८ ऑक्टोबर २०१७ रोजी विलीनीकरण झाले. तसेच कालका इस्टेट्समध्ये राणे कुटुंबीयांचे समभाग आहेत. म्हणून राणे कुटुंब या बंगल्यात राहत आहे. मुंबई महापालिका कायद्याच्या विविध कलमांचा भंग करत या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोप आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेकडून राणेंना नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेच्या पथकानं पाहणीही केली होती.

या बंगल्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला. बंगल्याची मालकी असलेली कंपनी कालका रिअल इस्टेट आणि संचालक कांता रामचंद्र राणे यांनी मुंबई महापालिकेच्या नोटिसा आणि आदेशांना आव्हान देणारी रिट याचिका हायकोर्टात दाखल केली. यावर आज, मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. बी याचिका कोर्टानं निकाली काढली असून, महापालिकेच्या नोटिशीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

उद्धव ठाकरेंकडेच तक्रार

नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधीश’ बंगला वाचवण्यासाठी मुंबई महापालिकाच प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदार संतोष दौंडकर यांनी केलाय. १५ दिवसांत अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस दिली असताना, ४ दिवसांत पुन्हा १५ दिवसांची मुदत देणारी नवीन नोटीस म्हणजे वेळकाढूपणाचा प्रयत्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या बंगल्यासाठी अनेक नियम पायदळी तुडवल्याची लेखी तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 22-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here