पाण्याची शुद्धता आणि सुरक्षा आपणच जपली पाहिजे : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

0

रत्नागिरी : निसर्गाने दिलेल्या संपत्तीचे जतन करणे, पाण्याच्या साठवणुकीसाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाण्याच्या स्रोतांना अबाधित ठेवले नाही, पाण्याची शुद्धता, सुरक्षा जपली नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिला.

रत्नगिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने जलजागृती सप्ताहनिमित्त आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डीडब्ल्यूएसएमचे प्रकल्प संचालक अमोल भोसले, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) डी. एस. परवडी, युनिसेफचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलकलशाचे पूजन करून कार्यशळेचे उद्घाटन झाले. ते पुढे म्हणाले की, अस्वच्छतेमुळे आपण विविध रोगांना स्वतःहून आमंत्रण देतो. पाणी स्वच्छतेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासकीय यंत्रणा शेवटी जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी काम करतात. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या आपल्या योजना असून त्या आपल्यासाठीच आहेत, ही भावना ठेवून लोकसहभागातून या योजना यशस्वी कराव्यात. पृष्ठावरील व भूगर्भातील जलसंपत्तीचा वापर करून पाण्याबाबत दीनवाणी झालेली आपली अवस्था संपन्नतेपर्यंत उंचाविण्याकरिता २२ मार्च या जल दिनानिमित्त रत्नगिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाने जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक नळजोडणी पूर्ण होऊन ग्रामस्थांनी घोषित केलेल्या ग्रामपंचायतींमधील सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, अंमलबजावणी सहाय्य संस्था, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी यांच्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या वर्षाकरिता भूजल या जागतिक जलदिनाच्या घोषवाक्याबाबत प्रभावी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आजपासून ३० मार्चपर्यंत जल जन जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान पाण्याची उपलब्धता, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि पाण्याबाबत शासनाची धोरणे इत्यादीबाबत जनजागृती करणे, पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकजागर करणे, याकरिता प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पथनाट्ये, कलापथक या प्रभावी माध्यमातून जनजागृती करण्याबाबतचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमामधील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागाचे महत्त्व, पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती, पावसाच्या पाण्याचे संकलन कार्यपद्धती, महत्त्व याविषयीची माहिती, स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व, पाण्याचे नमुने चाचण्या व तपासण्या कशा कराव्यात अशा विविध विषयांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. यासाठी युनिसेफ मुंबई, बी.ई.एफ.आय.ई. वॉटर फिल्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ठाणे येथून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी तसेच मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले होते.

उद्घाटन समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जैविक फिल्ड टेस्ट किटचे अनावरण करण्यात आले. गावपातळीवरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याची कारणे लक्षात यावी यासाठी हे किट उपयुक्त ठरणार आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात किटमधील विशिष्ट जैविक घटक टाकून सामान्य तापमानात २४ ते ४८ तासांनंतर त्या पाण्याचा रंग काळा पडल्यास ते पाणी पिण्यायोग्य नाही. पाण्याचा रंग काळा झाला नाही, तर ते पाणी पिण्यायोग्य आहे, असे समजावे. या किटच्या वापराने पाण्यामुळे होणाऱ्या रोगराईपासून बचाव करण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here