‘…तर मी राजकारण सोडेन’; अरविंद केजरीवालांचे भाजपला आव्हान

0

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. जर आताच दिल्लीतील महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपचा विजय झाला तर, मी राजकारण सोडेन, असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं.

दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी दिल्यानंतर, आम आदमी पक्षानं भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. निवडणुकांमध्ये पराभव होण्याच्या भीतीनं हा निर्णय घेतल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलं होतं. आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली महापालिका निवडणुका टाळणे हा शहिदांचा अवमान आहे. पराभवाच्या भीतीने भाजप महापालिका निवडणुका घेण्याचे टाळत आहे. भविष्यात हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही घेणार नाहीत, असं केजरीवाल म्हणाले.

महापालिका निवडणुका होऊ नयेत, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. दिल्लीतील तीन महापालिका एकत्रित करून एकच महापालिका केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुका टळू शकतात? गुजरातमध्ये पराभव होण्याच्या भीतीने हे निवडणुका घेणे टाळू शकतात. त्याकरिता गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करण्याचे कारण ते देऊ शकतात? अशाच प्रकारची कारणे पुढे करून भाजप लोकसभा निवडणुका घेणेही टाळू शकतात का?, असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले.

भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष मानतो. हाच जगातील सर्वात मोठा पक्ष एका छोट्याशा आम आदमी पक्षाला घाबरून पळ काढत आहे? हिंमत असेल तर, महापालिका निवडणुका वेळेवरच घेऊन दाखवाव्यात, असं आव्हानही केजरीवाल यांनी भाजपला दिलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 23-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here