प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन : रुपाली पाटील ठोंबरे

0

मुंबई : रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

आता मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे. जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करताना ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पेलली. एका व्यक्तीला दोन पदे असू नयेत म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत. महिलांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी तत्परतेने काम केलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेन. ज्या विश्वासाने मला पक्षात प्रवेश दिला तो विश्वास सार्थ करेन.”

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. आज त्यांनी राजीनामा दिला असून त्या ठिकाणी आता कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.

कोण आहेत रुपाली ठोंबरे पाटील?
एकेकाळी मनसेच्या फायरब्रॅन्ड नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जायच्या. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं आहे. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. 2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्ली बोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधलं होतं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 24-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here