केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ केली आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातलं…लुटारू सरकार, असंं म्हणत मंत्री बाळासाहेब थोरात भाजपवर यांनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत त्यामध्ये #सुटाबुटातलं…लुटारू सरकार असा उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 30% नी कमी झाल्या असताना देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि. 3 रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला असल्याची घणाघाती टीका थोरात यांनी केली आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल व डिझेलच्या किंमती केंद्र सरकारने वाढविल्या.पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश आणि गैरव्यवस्थापन यांचा हा परिणाम असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान,पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवलं आहे. यामुळे सरकारला सामान्य जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो.
