मार्लेश्वर रस्त्याचे काम सुरू करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडणार : रुपेश कदम

0

देवरुख : ( सुरेश सप्रे) महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे जाण्यासाठी श्रद्धाळू भाविक आणि पर्यटकांची रीघ लागलेली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर स्थानिक अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेली आहे. अशात आत्ता कुठे पर्यटक मार्लेश्वरकडे वळत आहेत असे चित्र दिसत असताना या देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग मात्र दयनीय अवस्थेत पहावयास मिळत आहे. या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका निर्माण झाली असून येणारा जाणारा प्रत्येकजण या रस्त्याबाबत खंत व्यक्त करत आहे.

रस्त्याच्या सद्यःस्थितीची पहाणी करून भाजपा रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम यांनी देवरुख-मार्लेश्वर रस्त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांजवळ चर्चा केली. अशात या रस्त्यासंदर्भात सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले. मात्र अजून एक महिना कामाचा श्रीगणेशा होईल की नाही याबाबत संदिग्धता असल्याचे मत व्यक्त केले.

यावर रुपेश कदम यांनी “मी या कामाचा स्वतः पाठपुरावा करत असून लोकांच्या हितासाठी आंदोलनास तयार आहे” असे सांगितले. मात्र जर या कामात दिरंगाई दिसून आली अथवा कोणत्याही कारणास्तव चालढकलपणा होत असल्याचे दिसून आल्यास दशक्रोशीतील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडू आणि त्यावेळी सुरू केलेले आंदोलन काम पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा दिला आहे.

यावेळी भाजप युवा मोर्चा देवरुखचे शहराध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, युवा नेते महेंद्र आंबेकर तसेच तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:52 PM 29-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here