मुंबईमध्ये पावसाच्या मुसळधार सरी सुरूच

0

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबईमध्ये तर पाऊस विश्रांती घेण्याचे नाव घेत नाही. आज, सकाळपासून पावसाच्या मुसळधार सरी सुरूच आहेत. आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे मुंबईतील पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज (ता.३) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे,मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी कळविले आहे. अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही बोरीकर यांनी केले आहे. याबरोबच मुंबई शहर जिल्ह्यात देखील सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे  यांनी सांगितले. तर, ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात जोरदार पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विरार पश्चिम, विवा कॉलेज, उत्कर्ष विद्यालयासमोरील बस स्थानक रस्ता, नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क, ओसवाल नगरी, तुलिंज रोड, आचोले रोड, वसई आनंद नगर, डिजी नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे मुंबईतील बहुतांशी मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. तर तिन्ही मार्गावरील लोकलवर पावसाचा परिणाम झाला असून लोकल १५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here