वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसचे आजपासून ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन

0

नवी दिल्ली : सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन मुद्द्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेस आजपासून महागाई मुक्त भारत आंदोलन करणार आहे. 31 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन करण्यात येणार आहे.

या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकारनं लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरु केल्याचे सुरजेवाला म्हणाले होते. तर ‘राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी’ असे म्हणत राहुल गांधींनीही इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून, त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधनाच्या दरात वाढ होत आहे. नोव्हेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच 22 मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्यानं दर वाढत आहेत.

आजपासून राज्यभर महागाईमुक्त भारत आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. आज सकाळी 11 वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. त्यानंतर 2 ते 4 एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर 7 एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.

निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको, म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या, मते घेतली, निवडून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली. सध्या सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून, 1 एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून, त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्च म्हणजे आजपासून सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 31-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here