डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्यास कडक कारवाई; आरोग्य राज्यमंत्र्यांचे आदेश

0

कोल्हापूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर त्यांनी बुधवारी हे आदेश दिले.

यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने औषध विक्री दुकानांची तपासणी मोहीम राबवून ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे. तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ हा कायदा राबविला जातो. त्यानुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊ शकतात. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात असेही सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 31-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here