सतीश उकेंकडील महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यासाठीच ईडीने धाड टाकली : नाना पटोले

0

नागपूर : सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) वकील सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही धाड मुंबईतील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आली. नागपूरमध्येही ईडीचे कार्यालय आहे. मात्र, त्यांना या सगळ्याचा पत्ताही नव्हता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्याकडील फाईल्स आणि त्यांचा मोबाईल जप्त केला आहे. या फाईल्समध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आहे. मात्र, ईडीचा गैरवापर करून या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला. ते गुरुवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणात स्यू मोटो याचिका दाखल करून हस्तक्षेप करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. ईडीचा कायदा हा ड्रग माफिया आणि दहशतवादाला चाप लावण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, आता त्या कायद्याचा गैरवापर केला जात आहे. एका वकिलाच्या फाईल्स जप्त करण्यासाठी ईडीचा वापर होत आहे. सतीश उके यांच्या घरी मुंबईतील ईडी अधिकारी फौजफाटा घेऊन पोहोचले होते. नागपूरमधील ईडी कार्यालयाला याची माहितीही नव्हती. या सगळ्या दबावतंत्राचा वापर कशासाठी केला जात आहे, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या. ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. भाजपच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:16 PM 31-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here