टिटवाळा : काल रात्रीपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. हा पुल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावाचा संपर्क तुटला आहे. या अगोदरही पाच दिवसांपूर्वी हा पुल पाण्याखाली गेला होता. १९९८ साली हा पुल बांधण्यात आला असून पुलाची साधारण लांबी १२८ मीटर, रूंदी साडेसात मीटर असून लो लेव्हल (सब मार्शिबल) ब्रीज प्रकारात असलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीत झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली जात असतो. हा पूल पाण्याखाली गेल्याने रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव उशीद, मढ, दानबाव, पळसोली, शेई, अंबरजे, काकडपाडा, कुंभारपाडा, गेरसे आदी गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलावरून रूंदे, आंबिवली, फळेगांव, मढ, उशिद, भोंगळपाडा,दानबाव, पळसोली, हाल, काकडपाडा आदी गावांतील लोकासाठी हा मार्ग प्रमुख आहे. या मार्गावरून वाशिंदवरून मुंबई- नाशिक महामार्गावर देखील जाता येते. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ४ वेळा हा पूल पाण्याखााली गेल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले. आता तरी प्रशासनाने गंभीर्याने दखल घेत नवीन उंच पूल बांधवा, अशी मागणी या निमित्ताने जोर धरु लागली आहे.
