रत्नागिरीत गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालखंडानंतर गुढीपाडव्याला (दि. २ एप्रिल) रत्नागिरीत निघणार असलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था, श्री पतितपावन मंदिर संस्था तसेच इतर समविचारी संस्थांनी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा उद्या सकाळी आयोजित केली आहे. येत्या २ एप्रिलला हिंदू एकतेचे दर्शन घडवत मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सुमारे ७५ संस्थांचे चित्ररथ, वाहने, ढोल, ताशापथके सामील होणार आहेत.

यासंदर्भात पतितपावन मंदिर संस्थेत झालेल्या दोन बैठकांना भैरी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (मुन्नाशेठ) सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक आनंद मराठे, पतितपावनचे माजी अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कॅप्टन कोमल सिंग, मोहन भावे, संतोष पावरी, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. स्वागतयात्रेच्या प्रचारासाठी काल (दि. ३१ मार्च) निघालेल्या दुचाकी फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच उत्साहाने स्वागतयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या्त्रेत गुलाल उधळला जाणार नाही. हिंदू बांधव आपापल्या परिसरात सजावट, रस्त्यावर रांगोळी काढून स्वागत करतील.

स्वागत यात्रेला श्री भैरी मंदिरातून सकाळी ९ वाजता सुरवात होईल. श्री देव भैरी, खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात यात्रेची सांगता होईल. मारुती मंदिर येथूनही सकाळी ९.३० वाजता स्वागतयात्रा निघेल आणि ही यात्रा मूळ स्वागतयात्रेत जयस्तंभ येथे सामील होईल. दोन वर्षांच्या खंडानंतर निघणार असलेल्या या स्वागतयात्रेत नागरिकांनी उत्साहाने आणि शांततेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:23 PM 01-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here