सिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालक्यातील तळगाव येथे अनधिकृतपणे बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीदरम्यान एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह 10 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

प्युअर अॅनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून सुप्रिया मधुकर दळवी यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार या सर्वांवर भादवि कलम 429, 34 यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजिक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होते. शेकडो लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यांनतर प्राणी मित्र संघटनानी एकत्र येत त्या व्हिडीओमधील व्यक्तींची खातरजमा केली. आयोजकांबाबत माहिती मिळवत त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेत बैलांची अनधिकृत झुंज लावणे, बैलांना क्रूरतेने व अमानुष वागणूक देऊन एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखपतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 12 प्रमुख संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवीसह या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने बैल झुंजीवर बंदी घातली आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे अनेक ठिकाणी बैल झुंजी घेतल्या जातात. मालवण मधील तळगाव गावात चक्क बैल झुंजी स्पर्धा भरवण्यात आल्या. त्यात आता 12 प्रमुख संशयिताना पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. यांना मालवण न्यायालयात हजर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:02 AM 02-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here