खेड : शुक्रवार दुपारपासून पावसाने खेड तालुक्याला पुन्हा झोडपायला सुरुवात केली असल्याने तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी रात्री 9 मीटरपर्यंत वाढल्याने जगबुडी पूल शुक्रवारी रात्री 11.20 वाजता वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी पुन्हा एकदा लटकले. जगबुडीचे पाणी शहरात घुसू लागल्याने खेड शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. खेड -दापोली मार्गावरील नारंगी नदीलाही पूर आल्याने या परिसरातील शेती पाण्याखाली गेली. शनिवारी थोडा वेळ वाहतूक सुरु देखील करण्यात आली होती मात्र पावसाचा वेग पुन्हा वाढल्याने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. मात्र शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला आणि पूर्वपदावर येत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. पावसाचा जोर अचानक वाढल्याने प्रशासन मदत ग्रुपच्या मदतीने जगबुडी नदीच्या पाणी पातळीवर नजर ठेवून होते. अखेर रात्री 11.20 वाजता पाण्याची पातळी धोका पातळी ओलांडून वर गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठया रांगा लागल्या. शनिवारी सकाळी 8 वाजता पाणी पातळी थोडी कमी झाल्यावर पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र तासाभरात पुन्हा पाण्याची पातळी वाढल्याने पूल पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
महामार्गावरील जगबुडी पूल वाहतुकीसाठी आता अतिशय धोकादायक झाला आहे. पाण्याच्या माऱ्याने पूल संरक्षक कठड्यासह एका बाजूला झुकल्यासारखा वाटत असल्याने या पुलावर कधीही सावित्री नदी पुलाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावर 24 तास बारीक तास लक्ष ठेवावा लागत असून मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व त्यांचे सदस्य या कामी प्रशासनाला मदत करत आहेत.
