मुंबई-गोवा महामार्गावरील भोके फाटा येथे वॅगनार कारवर समोरासमोर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात अब्दुल हकीम मेहंदी (वय ४२, रा. कारवांचीवाडी) यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रोहन संतोष पारदळे (२४, रा. मुंबई) हे आपल्या ताब्यात वॅगनार कार घेऊन शनिवारी रात्री मुंबईतून रत्नागिरीला निघाले होते. रविवारी सकाळी ते मुंबई-गोवा महामार्गावरील भोके फाटा येथे आले असता, समोरून अब्दुल मेहंदी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन हातखंबा ते निवळी जाताना भोके फाटा वळणावर समोरून येणाऱ्या वॅगनार कारवर आदळले. दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अब्दुल मेहंदी गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करुन अब्दुल मेहंदी यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
