बोट दुर्घटना : ‘अभिमानास्पद कामगिरीबद्दल पोलीस प्रशांत घरत यांना माझा सॅल्यूट’ – गृहमंत्री

0

बोट अपघातातून प्रसंगावधान राखत ८८ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावल्याने अवघ्या महाराष्ट्राचे कौतुक ठरलेले पोलीस नाईक प्रशांत घरत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. ‘अभिमानास्पद कामगिरीबद्दल पोलीस प्रशांत घरत यांना माझा महासॅल्यूट’ असं त्यांनी म्हटलं आहे. गेट वे हून अलिबागला जाणारी प्रवासी लाँच काल मांडव्याजवळ अपघातग्रस्त झाली. या बोटीत ८८ प्रवासी होते. ही बोट बुडत असताना तेथे मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बोटीतून गस्ती घालत होते. त्यांनी तात्काळ प्रवाश्यांच्या मदतीला धाव घेतली तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खलाश्यांच्या मदतीने पोलीस गस्तीवरील बोटीत आणि अन्य एका प्रवासी बोटीत बसवून किनाऱ्याला आणले. श्री. घरत यांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलीस दलाची शान उंचावली आहे, असे कौतुकाचे उद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले. आपल्या राज्यातल्या पोलिस हा लोकहित व सुरक्षिततेच्या दृष्टीने किती जागरूक आहे याचे हे सुंदर उदाहरण आहे, असेही गृहमंत्री या प्रसंगी म्हणाले. घरत यांनीदेखील गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना सांगितले, असा सत्कार व पाठीवर थाप खूप प्रेरणादायी आहे. पोलिस दलातील इतरांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here