सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना 7 दिवसांची सीबीआय कस्टडी

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली.

अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टानं या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत हे तिन्ही आरोपी पुढील चौकशीकरता सीबीआयच्या ताब्यात राहतील. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख यांनाही अटक करण्याची कोर्टानं सीबीआयला परवानगी दिलेली आहे. मात्र देशमुख सध्या जेजे रूग्णालयात दाखल असल्यानं त्यांची अटक तूर्तास टळली आहे.

अनिल देशमुखांच्या चौकशीत राज्य सरकारही सहकार्य करत नाही असा थेट आरोप सीबीआयच्यावतीनं कोर्टात करण्यात आला. तसेच कोर्टाचे आदेश मिळताच अनिल देशमुखांच्या अचानक रूग्णालयात दाखल होण्यावरही सीबीआयनं सवाल उपस्थित केला. अनिल देशमुखांची कस्टडीची कोर्टाकडनं परवानगी गुरूवारी मिळाल्यानंतर आर्थर रोड जेल प्रशासनानं सोमावरी त्यांची कस्टडी देऊ असं सांगितलं होतं. मात्र सोमवारी जेव्हा सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड जेलमध्ये गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अनिल देशमुख बाथरूममध्ये पाय घसरून पडले ज्यात त्यांचा खांदा निखळल्यानं त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुखांशी संबंधित प्रकरणात जवळपास 400 कोटींच्या भ्रष्टाचाराची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची सीबीआयनं कोर्टाकडे मागणी केली होती. मात्र विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए.ए. सय्यद यांनी आरोपींना दिल्लीला घेऊन जाऊन चौकशी करण्याची परवानगी नाकारली. तसेच अनिल देशमुखांना अचानक जेजे रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट मागवण्यासही नकार दिला.

ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनेच सीबीआयनं यांची कारागृहात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळेच केंद्रीय तपासयंत्रणेनं या चौघांचीही कस्टडीत चौकशी करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज केला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यांत सुनावणी होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:33 PM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here