मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविरोधात आंदोलनाचा इशारा

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या राजापूर तालुक्यातील कामाबद्दल राजापूर तालुका भाजपने संताप केला असून सर्वपक्षीय आंदोलन उभारले जाणार असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. ठेकेदाराची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे. या निकृष्ट कामामुळे महामार्गावर अपघात होऊन अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. याकडे प्रशासन व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याविरोधात आता सर्वपक्षीय आंदोलन उभारले जाणार आहे.

राजापूर शहरात एसटी आगारासमोर उड्डाण पुलाचा शेवट झाला आहे. या ठिकाणी भरधाव वेगात गाड्या येत आहेत. तेथे वाहतूक सर्कल करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र या भागात जाणारे रस्ते, शहरात येणारी वाहतूक आणि एसटी आगाराकडे जाणारी वाहतूक लक्षात घेता तेथे गंभीर अपघातांचा धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग काढला जावा, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याचे गुरव यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट आणि घाईगडबडीत काम करण्यात आले आहे. कोंढेतड कुंभारवाडीजवळ गेले वर्षभर ठेकेदाराने मातीचा भराव टाकून ठेवला असून संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे तेथे आठवड्यातून एक – दोन अपघात होत आहेत. याबाबत ठेकेदाराला सांगूनही तसेच प्रशासनाला माहिती निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही होत नाही. अनेक त्रुटी दाखवूनही त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे आता या विरोधात सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व स्थानिक जमीन मालक आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन लवकरच जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्री. गुरव यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here