सोमय्या अचूक भाकीत वर्तविणारा गृहस्थ, २-४ दिवसांत काहीतरी घडतंच : जयंत पाटील

0

मुंबई : ईडीने कोणतीही पूर्वकल्पना न देता संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीला संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणायचीच होती तर आधी त्यांना माहिती दिली पाहिजे होती. त्यामुळे ही कारवाई म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतोय, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या आणि ईडी यांच्यातील अनोख्या समन्वयावरही भाष्य केले. किरीट सोमय्या बोलतात. त्यानंतर दोन ते चार दिवसांत घटना घडतात. केंद्रीय तपास यंत्रणा किरीट सोमय्या यांना माहिती देत असाव्यात. किरीट सोमय्या यांना तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची अगोदरपासूनच कल्पना असते. त्यामुळे राज्यात किरीट सोमय्या यांची ओळख अचूक भाकीत वर्तविणारा गृहस्थ अशी झाली आहे, अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना काय पुरावे दिलेत हे मला माहिती नाही. पण देशाच्या सरन्यायाधीशांनीही ईडीच्या कारवाईविषयी मत व्यक्त केले आहे. याचा अर्थ ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. ईडीच्या अशा कारवायांमुळे महाविकासआघाडी सरकारवर परिणाम होण्याचा प्रश्न नाही. अशा कारवायांच्या माध्यमातून सरकारशी संबंधित लोकांना बदनाम करण्याचा, जनतेमध्ये संभ्रम आणि शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. यावेळी प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना हिंदीत प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. मात्र, मी हिंदीत बोलणार नाही. हिंदीत बोललं की पार दिल्लीला जातं, अशी मिश्कील टिप्पणी यावेळी जयंत पाटील यांनी केली.

मी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो : किरीट सोमय्या

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टाच आणली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवरील कारवाईसाठी आपण तपास यंत्रणांकडे आग्रह धरल्याचे सांगितले. संजय राऊत यांचे स्नेही आणि व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राऊत यांनी धावपळ सुरू केली होती. राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात मोठी रक्कम कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती. प्रवीण राऊत प्रकरणातही संजय राऊत यांची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही मी दिल्लीत ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून केली होती,’ असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:56 PM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here