कुसुमताई अभ्यंकर द्रष्ट्या नेत्या : बाळ माने

0

रत्नागिरी : रत्नागिरीच्या माजी आमदार कै. कुसुमताई अभ्यंकर म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या द्रष्ट्या नेत्या होत्या. त्यांच्या निधनाला अडतीस वर्षे झाली, तरी त्यांची आठवण काढली जाते, यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते. त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा संकल्प त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी मंगळवारी येथे केले.

कुसुमताई अभ्यंकर यांचे ५ एप्रिल १९८४ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, कुसुमताई अभ्यंकर विधानसभेच्या स्वतःची छाप उमटविणाऱ्या त्या महिला आमदार होत्या. दीर्घ आजाराने त्यांचे १९८४ साली निधन झाले. त्यांनी शिवाजीराव गोताड यांचे नाव आधीच आपला उत्तराधिकारी म्हणून सुचविले होते. त्यांना उमेदवारी मिळाली. एवढे कुसुमताईंच्या मताला महत्त्व होते. आजही कुसुमताई गेल्या, असे वाटत नाही, इतका त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद होती. आधी त्या जनता पक्षाच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण १९८० साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीत त्या नुकताच भाजपची कमळ चिन्ह नवही, होते. प्रथमच त्या निवडून आल्या. अवघ्या ५५० मतांनी त्या निवडून आल्या. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच हे घडले. तेव्हाच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्ष रत्नागिरी शहर आणि तालुक्यात लोकप्रिय होता. पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले होते. आज देशात अनुकूल वातावरण आहे. मोदींचा जगात गवगवा होतो, अशा स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात आपले लोकप्रतिनिधी निवडून आले नाहीत, त्याचा दोष जनतेला देता येणार नाही. कुसुमताईंची आठवण आज करताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेले कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. आदेश तंतोतंत अमलात आणले पाहिजेत. रत्नागिरीत नगरसेवक, नगराध्यक्ष भाजपचे असले पाहिजेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. आपला आदर्श असलेल्या कुसुमताईंचे स्मरण करताना आपण तसा संकल्प करू या.

तत्पूर्वी रत्नागिरीच्या माजी नगरसेविका सौ. शिल्पा धुंदूर म्हणाल्या, साधना असते. ध्येय गाठायचे असेल, तर साधना करावी लागते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुसुमताई अभ्यंकर होत. सर्वसामान्य माणसांपासून समाजातल्या सर्व घटकांपर्यंत त्यांचा वावर होता. त्यांच्या आमदारकीच्या सुरुवातीच्या काळात सिमेंटची टंचाई होती. तेव्हा सामान्य लोकांची घरे बांधायची अडचण निर्माण झाली होती. अशा वेळी सिमेंट उपलब्ध करून त्यांनी अनेकांची घरे अक्षरशः उभी केली. व्यासंग, इंग्रजी, मराठी, हिंदीचे वाचन अफाट होते. तो व्यासंग आणि सर्वांशी असलेला संपर्क यामुळेच घरोघरी त्यांचे नाव झाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. विलास पाटणे म्हणाले, कुसुमताई अभ्यंकर यांच्या अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहेत. रत्नाप्पा अण्णा कुंभार तेव्हा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. तेव्हा रास्त दराच्या धान्याच्या तुटवड्याच्या निषेधार्थ महिलांनी महिला विद्यालयात निदर्शने केली. कुसुमताई यांच्या नेतृत्वाखाली झालेले ते आंदोलन खूपच महत्त्वाचे होते. त्यानंतरच त्यांची आमदार म्हणून निवड झाली. त्यांनी प्रचंड काम केले. त्या तळागाळात पोहोचत. कुठेही बसून चहा घेत. भाकरी खात. मुंबईत त्यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला शरद पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. अगदी सामान्य माणसालाही भावेल, असे त्या लिहीत आणि वक्तृत्वही तसेच साधे होते. त्यामुळे त्या कोणतीही सभा सहज जिंकत असत. त्यांच्या या गुणाचे शरद पवारांनीही तेव्हा कौतुक केले होते. अशा व्यक्तींचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या कार्याला उजाळा दिला पाहिजे आणि त्यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले, एक लोकप्रतिनिधी लोकांच्या घरापर्यंत चुलीपर्यंत जाऊ शकतो, परिवर्तन घडवू शकतो, कुसुमताईँनी दाखवून दिले. अनेक ठिकाणी त्यांचा वावर होता. म्हणून त्यांचा तळागाळात ठसा होता. शाश्वत विकासाची दृष्टी त्यांना होती. आपले आमदारकीचे वजन वापरून ४० वर्षांपूर्वी त्यांनी पॉलिटेक्निक रत्नागिरीत आणले. आपल्या विचार आमदार कसा असावा, याचे उदाहरण ते उत्तम उदाहरण होते. कुसुमताईंच्या आठवणी जागवताना एकंदर संघटन मजबूत करण्याचा संकल्प करू या. कुसुमताई म्हणजे सर्व समाजाचे नेतृत्व होते. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले, तर पुढच्या सर्व निवडणुका भाजपसाठी चांगल्या असतील. कुसुमताईंच्या निवडणुकीच्या आणि कामगिरीच्या काही आठवणीही अॅड. पटवर्धन यांनी जागविल्या.उमेश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. समारंभाला जिल्हा आणि तालुका भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 06-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here