एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा सलग दुसऱ्या दिवशी धक्का; कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

0

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत आज पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी नवा अल्टीमेटम दिल्याने विलीनीकरणाच्या मागणीबाबत संपकऱ्यांची निराशा झाली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी मुंबई हायकोर्टाने २२ एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. तोपर्यंत जे कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला मार्ग मोकळा असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे संप मिटवून कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर व्हावं लागणार आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देणे, ग्रॅच्युइटी, पीएफ-पेन्शन वेळेत मिळणे इत्यादीविषयी आम्ही आदेश देऊ, असं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कामावर रुजू होण्याची तयारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, असं हायकोर्टाने सांगितल्यानंतर एसटी महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जे संपकरी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांच्याविरोधात बडतर्फी, निलंबन किंवा अन्य कारवाई सुरू असली तरी ती मागे घेऊन समज देऊन कामावर घेऊ,’ अशी हमी एसटी महामंडळाने हायकोर्टात दिली आहे.

दरम्यान, ज्यांच्याविरोधात हिंसाचाराबद्दल एफआयआर दाखल आहेत त्यांनाही आम्ही कामावर घेऊ, त्या कारणावरून कामावरून काढणार नाही, मात्र एफआयआरप्रमाणे जी कारवाई व्हायची असेल ती होईल, अशी भूमिका एसटी महामंडळाने हायकोर्टात मांडली आहे. मात्र, याबद्दलही आम्ही योग्य तो आदेश देऊ, असे संकेत हायकोर्टाने दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 07-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here