रिक्‍त पदांमुळे रत्नागिरी आरोग्य विभाग ‘व्हेंटिलेटरवर’

0

रत्नागिरी : सध्या कोरोना जिल्ह्यातून जवळपास हद्दपारच झाला आहे. गेले काही दिवस एकही रुग्ण सापडलेला नाही. यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी झाला असला तरी वर्ग 3, वर्ग 4 ची कर्मचार्‍यांची पदे दिवसेंदिवस रिक्‍त होत निघाली आहेत. सुमारे 381 पदे सध्या रिक्‍त आहेत. यामुळे कामकाज चालवताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गतवर्षी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या रिक्‍त पदांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेली होती. मात्र, त्याला पर्याय म्हणून कंत्राटी तत्त्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्‍यांची जिल्हास्तरावर भरती करण्याचा निर्णय झाला. शासनाने 40 हजार रुपये मानधनावर तदर्थ म्हणून नियुक्त करण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाला दिले.

जिल्हा परिषदेची 67 प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी अशी 141 पदे मंजूर होती. ती सर्वच्या सर्व भरलेली आहेत. परंतु, वर्ग 3 ची 309 आणि वर्ग 4 संवर्गातील 72 रिक्त पदे रिक्त असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षात नव्याने भरती न झाल्यामुळे सेवानिवृत्त वाढत आहेत. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, परिचर हे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात, तर रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचार्‍यांवर असते.

पायाच डळमळायला लागल्याने आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते. सगळ्याच आरोग्य केंद्रात ही परिस्थिती आहे. दुर्गम गावांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसतोय. सेवानिवृत्तीने पद रिक्त झाल्यावर तेथे नियुक्ती कशी द्यायची असा प्रश्न तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांना पडतो. तदर्थ वैद्यकीय अधिकार्‍यांप्रमाणे तात्पुरती नियुक्तीसंदर्भात निर्णय घेतला तर यामधून सावरणे शक्य आहे. त्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिल्यास उपयुक्त ठरेल, अन्यथा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे चित्र जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 09-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here