शरद पवारांच्या घरावरील हल्ला निषेधार्ह; ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे : नाना पटोले

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत ? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या, काल न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला तो निर्णयही सर्वांना मान्य आहे परंतु आज अचानक एक मोठा जमाव शरद पवार यांच्या घरावर चाल करुन जातो हा नियोजनबद्धरितीने केलेला हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना भडकावणारा कोण आहे ? या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी.

आजही आम्ही सर्वजण एसटी कामगारांच्या पाठीमागे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत जरब बसेल अशी कठोर कारवाई करावी, असे पटोले म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 09-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here