“बाप-बेटे तुरुंगात जाणार, देशमुख-मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार”; संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा

0

मुंबई : राज्यात अनेकविध घटनांमुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस विक्रांतच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. यामुळे किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार, असे ट्विट केले आहे. तसेच आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.

दरम्यान, विक्रांत निधी संकलन प्रकरण २०१३ मधील आहे. त्या प्रकरणी आता एफआयआर दाखल झाला आहे. यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा युक्तिवाद किरीट सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेना आणि अन्य पक्षांनी विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जमा केलेला निधी आपल्या पक्षाकडे सुपूर्द केला, असेही किरीट सोमय्यांचे वकील पुढे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 12-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here