भीमा-कोरेगावप्रकरणी शरद पवारांना समन्स

0

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगसमोर साक्ष होणार आहे. यासाठी आयोग शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळत पवारांना आयोगासमोर हजर रहावं लागणार आहे. ही हजेरी टाळता येणार नाही. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी ही माहिती दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल केलेले सागर शिंदे यांनी पवारांची आयोगाने साक्ष घ्यावी, असा अर्ज आयोगासमोर केला होता. आयोगाने यापूर्वी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना कोरेगाव भीमा प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी गेल्या वर्षी नोटीस पाठवली होती. त्यावेळी केवळ राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. मात्र आता शरद पवारांनी उघड केलेली काही माहिती ती प्रतिज्ञापत्रात नव्हती. प्रामुख्याने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यामुळे कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांकडे असलेली जादा माहिती आयोगासमोर यावी म्हणून पवारांना साक्षीसाठी बोलवावं अशी मागणी सागर शिंदे यांनी केली होती. त्यावर सुनावणी करताना आपण शरद पवारांना साक्षीसाठी बोलवणारच आहोत, असे आयोगाने सांगितले होते. जेव्हा पवार साक्षीसाठी येतील तेव्हा तुम्ही तुमच्या अर्जातील प्रश्न उपस्थित करू शकता, असेही आयोगाने तेव्हा म्हटले होते. त्यानुसार आता आयोगाने पवारांना साक्षीसाठी बोलवलं आहे. या साक्षीत पवार काय नवीन माहिती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here