रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दातांच्या दवाखान्यांमध्ये आजपासून (ता. १८) फक्त अत्यावश्यक सेवा दिवसातील थोडा वेळ चालू राहतील. बाकीच्या सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी डेंटल असोसिएशनने घेतला आहे. याबाबत असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. प्रिया यादव यांनी माहिती दिली. कोरोना विषाणूबाधित व्यक्तीची लाळ, शिंकणे, खोकला असल्यास हा आजार पसरतो. दातांच्या बऱ्याच उपचारामध्ये पाण्याचा फवारा येत असल्याने त्यामुळे दातांच्या दवाखान्यातून त्याचा प्रसार होण्याचा अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी खबरदारी म्हणून केवळ अत्यावश्यक उपचार सुरू ठेऊन इतर सेवा बंद केल्या आहेत. सर्व डेंटल क्लिनिक थोडाच वेळ फक्त अत्यावश्यक सेवांसाठी चालू राहतील. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला रुग्णांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रिया यादव यांनी केले आहे.
