जाकादेवी प्रशालेतर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन

0


जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


यावेळी सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य, देश-विदेशातील पदव्या तसेच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेब यांनी केलेला क्रांतिकारक बदल, भारतीय संविधान निर्मितीच्या कार्यात बाबासाहेबांचं अनमोल योगदान तसेच स्त्रिया, कष्टकरी ,शेतकरी, वंचित यांच्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले लढे, केलेले कायदे या संदर्भात शालेय हिंदी विषयाचे प्रमुख व कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नामदेव वाघमारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च पदव्या आणि त्यांचे सामाजिक आणि राष्ट्रीय योगदान आपल्या भाषणातून कथन केले.


अध्यक्षीय विचारातून बिपीन परकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुष आपल्या देशाला लाभला हे आपले सर्वांचे भाग्य आहे, अशा या महापुरुषाने आपलं सर्वस्व भारतीय समाजासाठी समर्पित केले. प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब यांची विश्वबंधुत्वाची, मानवतावादाची संकल्पना अंगिकारण्याची गरज असल्याचे सांगून मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागाचे शिवानंद गुरव यांनी मानले . याप्रसंगी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी सुशांत लाकडे, शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील, शिवानंद गुरव ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here