धामणसे येथील सोमगंगा नदीचा गाळ काढण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

0

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथे गुढीपाडव्याला ग्रामस्थांनी बहुसंख्येने एकत्र येत सोमगंगा नदीचा गाळ नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने काढण्याचा संकल्प केला.

श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट धामणसे यांनी आवाहन करीत ग्रामस्थांना एकत्र केले. यावेळी प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर महाराजांच्या फोटोला हार घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नथुराम गंगाराम पांचाळ यांनी स्वीकारले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष अविनाश जोशी यांनी केले.

पन्नास वर्षांपूर्वी धामणसे हे खडतर प्रवासाचे गाव असूनही प्रथम नथुराम गंगाराम पांचाळ यांनी सन १९७२ साली धामणसे येथे आपला व्यवसाय सुरू केला. या वर्षी या व्यवसायाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून त्यांचा शाल, श्रीफळ, हार व श्री रत्नेश्वरांचा फोटो देऊन गावाच्या वतीने ग्रामस्थ दिपक सांबरे व रविंद्र रेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नथुराम गंगाराम पांचाळ म्हणाले की, त्यावेळी गावात रस्ता नसताना व केवळ साडेतीन हजाराचे भांडवल उभे करुन हा व्यवसाय करताना त्यावेळचे सरपंच बाळभाऊ देसाई माझ्या मागे समर्थपणे उभे राहिले होते म्हणून आपण हे करु शकलो. बाळभाऊ देसाई हेच माझे गुरु व मार्गदर्शक होते. नाम फाऊंडेशन च्या सहकार्याने धामणसे येथील सोमगंगा नदीचा गाळ उपसण्याचा व सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

याप्रसंगी धामणसे गावात हा विषय घेऊन येणारे राजू भाटलेकर अध्यक्ष, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था यांनी नाम फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय व धामणसे ग्रामस्थ यांच्यामधील समन्वय साधून सोमगंगा नदी गाळमुक्त करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल ग्रामस्थांनी या कामात सहभागी होण्याचे ठरवले व श्री. भाटलेकर यांचे टाळ्यांचा गजरात आभार मानले.

सोमगंगा नदी ही ओरी येथील सोमेश्वराच्या चरणाशी उगम होऊन धामणसे येथील श्री रत्नेश्वर व पुढे नेवरे येथील विश्वेश्वर च्या बाजूने वहात जाऊन समुद्राला मिळते. गाळ उपसल्या नंतर हि नदी कायम स्वच्छ रहावी त्या नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असे आवाहन संजय हर्षे, अध्यक्ष, श्री विश्वेश्वर देवस्थान नेवरे यांनी केले.

ओरी मध्ये सोमेश्वर, धामणसे येथील रत्नेश्वर, नेवरे येथील विश्वेश्वर अशी तीन शिवमंदिरे असल्याने नदीच्या दोन्ही बाजूला पक्की पायवाट करुन सोमगंगा परिक्रमा सुरवात करावी जेणेकरून नदी स्वच्छ राहिलच परंतु पर्यटक व भक्तगण ही परिक्रमा करुन तीनही देवस्थानाचे दर्शन घेऊ शकतील असे प्रतिपादन सोमेश्वर देवस्थान ओरी चे अध्यक्ष श्री. सुशिल देसाई यांनी केले.

धामणसे गावातून जाणारा रस्ता हा पर्यायी महामार्ग असल्याचे शासकीय पत्रकात आढळते. दोन राष्ट्रीय महामार्ग जोडणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता हि सरकारी योजना आहे. म्हणून शास्त्रीपूल (संगमेश्वर) डिंगणी फुणगूस जाकादेवी ओरी धामणसे नेवरे हा राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता झाल्यास त्याचा मोठा फायदा धामणसे गावाला होईल व त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असे श्री. प्रमोद केळकर, अध्यक्ष, हाॅटेल्स अॅन्ड टुरिझम असोशिएशन गणपतीपुळे यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.

धामणसे हे गाव ऐतिहासिक तसेच जवळपास पंचवीस हजार वर्षे पुर्वीची कातळशिल्प असलेले गाव आहे. आपण हे जपले पाहिजे. हेच लक्षात घेऊन आपण आपल्या गावाचे पर्यटन कसे वाढवता येईल यासाठी तरुणांनी पुढे यावे. आम्ही संशोधन करुन अधिक माहिती गोळा करुन हे गाव ग्रामपर्यटन, ऐतिहासिक , नैसर्गिक तसेच कृषी पर्यटन कसे करता येईल यासाठी नक्की सहकार्य करू मात्र गावातील लोकांनी स्वतःहून आमच्याकडे संवाद साधायला हवा.. असे मार्मिक व सूचक वक्तव्य श्री. सुधीर रिसबूड, कातळशिल्प संशोधक यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र पांचाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन अमर रहाटे यांनी उत्तमरितीने केल्याबद्दल श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व समृद्ध धामणसे चळवळीचे प्रमुख श्री. शेखर देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here