कोकण विविध प्रकारच्या जैवविविधतेने नटलेले आहे. विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरं, वनस्पतींच्या अनेकविध प्रजाती येथे बघायला मिळतात. निसर्गमित्र असणाऱ्या देवरुख येथील प्रतिक मोरे आणि डॉ. शार्दूल केळकर या दोघांनी देवरुख आणि आसपासचा परिसर अक्षरशः पिंजून काढलाय. निसर्गात फिरत असतांना या दोघांनी सह्याद्रीच्या पायथ्याजवळ असलेल्या कुंडी गावात 78 प्रजातींची फुलपाखरे आढळत असल्याचे शोधून काढले आहे. प्रतीक मोरे यांनी स्वतःच्या परसदारी फुलपाखरांसाठी विशिष्ट प्रकारची फुलझाडे लावून फुलपाखरू उद्यान तयार केले आहे, तर डॉ. शार्दूल केळकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ असे पक्षी आढळत असल्याचे दाखवून दिले आहे. देवरुख पासून साधारण 15 किलोमीटरवर कुंडी गाव, तिथून पुढे 1 किलोमीटरवर एक देवराई आहे. त्या ठिकाणी कोरड्या नदीपात्रात फुलपाखरांचा समूह आढळून येतो. येथील नदी महिमतगडाच्या पायथ्याशी उगम पावते आणि कुंडी गावातून वहाते सध्या मात्र ती कोरडी ठाक पडली आहे. पण पाणी कमी झालं की ,फुलपाखरं पाणी, चिखल असेल त्या ठिकाणी येतात. त्यातून त्यांना आवश्यक ती मिनरल्स मिळतात. कुंडी भागात फुलपाखरांच्या 78 प्रजाती सापडतात असा अहवाल आहे. देवरुखमध्ये 110 प्रकारची आणि दोन्ही ठिकाणी मिळून 140 च्या आसपास फुलपाखरं सापडतात. यामध्ये एगफ्लाय, ब्ल्यू मार्मोन, कॉमन मार्मोन, क्वेकर, नवाब, चॉकलेट पॅनसी, लेमन पॅनसी, लाईन ब्ल्यू, ग्रास ज्वेल, मॅप, एमीग्रॅंट, डार्क सेरुलियन, तमील येओमन, क्लब बीक्ड, डबल ब्रॅंडेड जूडी, लास्कर, रस्टीक, फरगेट मी नॉट, स्पॉटेड स्मॉल फ्लॅंट, दखन स्पॉटेड फ्लॅंट, सनबीम, लाईम स्वालो टेल आणि हेज ब्ल्यू अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. ऊन चढायला लागल्यावर फुलपाखरं खूप सजग होतात. त्यानंतर ती एका जागी क्वचितच बसतात त्यामुळे त्यांची छायाचित्रे काढणं कठीण होऊन जातं. फुलपाखरांची छायाचित्रे घ्यायची असतील तर, खूप वेळ वाट पाहावी लागते आणि यासाठी कमालीचा संयम असणे गरजेचे असल्याचे प्रतीक मोरे यांनी स्पष्ट केले.
