रत्नागिरी: बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १२० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीत तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
