आज उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल; महाविकास आघाडी की भाजप, कोण बाजी मारणार?

0

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर होणार आहे.

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. ही निवडणूक राज्याची पुढील राजकीय दिशादर्शक ठरणार आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली. तर भाजप कडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती निकालाची.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले. त्यामुळे कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्याला निवडून देतील असं जयश्री जाधव यांनी बोलून दाखवलं.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा

  • 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले
  • राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला
  • 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले
  • त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते
  • तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते
    महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. शिवसेनेची नाराज मते कुणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला? त्यामुळे अजूनही राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीचा अंदाज येत नाही.
    निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज दुपारी साधारण बारा वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 16-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here