पेण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली

0

रत्नागिरी : मागील दोन दिवस सतत पडत असलेल्या  पावासाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. पेण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली. या मार्गावरील गाड्या अर्धा ते आठ तास उशिराने धावत होत्या. ही दुर्घटना डाऊन ट्रॅकवर घडल्याने कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सायंकाळपर्यंत विस्कळीत पण सुरू होती. पेणजवळ आपटा ती जिते स्थानकादरम्यान दुश्मी रेल्वे गेट परिसरात दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी एक्स्प्रेस या परिसरात अडकली. जबलपूर कोईमतूर गाडी, चंदीगड-मडगाव-गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्स्प्रेस, निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी पनवेल ते रोहा या दरम्यान थांबवण्यात  आल्या होत्या तर मांडवी एक्स्प्रेस सीएसएटी स्थानकावरून सोडण्यात आली नव्हती. याचबरोबर मुंबईकडे जाणार्‍या गाड्याही उशिराने धावत होत्या. रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम कोकण रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here