कवी माधव, कवी आनंद पुरस्कार अख्तर दलवाई, मनाली बावधनकर यांना जाहीर

0

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा कवी माधव पुरस्कार अख्तर दलवाई यांना, तर कवी आनंद पुरस्कार सौ. मनाली बावधनकर यांना जाहीर झाले आहेत.

कवी माधव आणि कवी आनंद या दोन ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कथा, कविता, ललित साहित्य प्रकारातील उत्तम पुस्तकांना वाचनालयातर्फे पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा कवी माधव पुरस्कार मिरजोळी येथील अख्तर अब्बास दलवाई यांच्या ‘निरांजन हे तेवत राहो’ या कादंबरीला, तर कवी आनंद पुरस्कार प्रा. मनाली बावधनकर यांच्या ‘ओघळलेले मोती’ या ललित लेख संग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात येत्या रविवारी (दि. २४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता होईल.

कवी माधव ऊर्फ माधव केशव काटदरे आणि कवी आनंद ऊर्फ वि. ल. बरवे या मागील पिढीतील दोन्ही साहित्यिकांची चिपळूण ही कर्मभूमी आहे. त्यांचे वाचनालयाशी ऋणानुबंध होते. कवी माधव यांनी वाचनालयाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या दोघांच्या निवडक साहित्याचा समावेश असणारे आनंदाचे डोही (संपादन अरुण इंगवले) आणि कविता माधवांची (संपादन डॉ. संध्या देशपांडे) ग्रंथांचे प्रकाशन झाले होते. या ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावे दिले जाणारे हे पुरस्कार आहेत. दलवाई यांची ‘निरंजन हे तेवत राहो’ ही पुस्तक रूपातील पहिली कलाकृती आहे. जुन्या शाश्वत मूल्यांना मोडीत काढून झपाट्याने बदलणारा समाज हा या कादंबरीचा पट आहे. प्रा. मनाली बावधनकर गुहागरच्या खरे-ढेरे महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करतात. व्याख्यात्या आणि कथाकथनकार अशी त्यांची ओळख आहे. लवकरच ‘बाईपणाच्या उंबरठ्यावर’ हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित होत आहे.

या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य अॅड. यशवंत कदम यांच्या हस्ते होणार असून लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. तिरुपती इल्तापवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 20-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here