ॲड. गुणरत्न सदावर्तेंना आज न्यायालयात हजर करणार

0

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणात अटक केलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई, सातारापाठाेपाठ कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी दुपारी ऑर्थर रोड कारागृहातून ताबा घेतला. त्याना पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा कोल्हापुरात आणण्यात येत आहे. त्याना अटक दाखवून आज, गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्यातून सदावर्तेला न्यायालयात नेण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा नोंदवला होता. ॲड. सदावर्ते याने मराठा आरक्षणाविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी अनेक ठिकाणांहून पैसे जमा केले होते, त्याचा त्याने हिशेब दिलेला नाही, त्यामुळे त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचीही मागणी पाटील यांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्याबाबत ॲड. सदावर्ते याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. पण सरकारी पक्षाला कागदपत्रे मिळाली नसल्याने त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारची सुनावणी होऊ शकली नाही. ती सुनावणी आज, गुरुवारी होत आहे.

दरम्यान, कोल्हापूर पोलीस सोमवारी रात्रीच ॲड. सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी गिरगाव न्यायालयात ॲड. सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केला, तो न्यायालयाने मंजूर करून ताबा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी ऑर्थर रोडमधून त्याचा रीतसर ताबा घेतला.

ॲड. सदावर्तेचा ताबा घेऊन सायंकाळी कोल्हापूर पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. तो रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला आज, गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अकोट पोलिसांचाही अर्ज

दरम्यान, गिरगाव न्यायालयात त्याचा ताबा मिळण्यासाठी अकोट पोलिसांनीही अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याशिवाय ताबा देता येणार नाही असे न्यायालयाने अकोट पोलिसांना सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 21-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here