उक्षी : कार नदीत कोसळून एक जण वाहून गेला

0

रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांची इको कार परतत असताना मुसळधार पावसामुळे समोरचा रस्ता न दिसल्याने थेट उक्षी येथे नदीत कोसळली. नदीतील पाण्याच्या लोंढ्यासोबत इको कार वाहून जात असताना कारमधील पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, पाण्याच्या प्रवाहासोबत कारसह एक जण वाहून गेला. ही घटना रविवारी सायंकाळी 5.30 वा सुमारास घडली. शनिवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सुट्टी असल्याने जयगड येथील जिंदाल कंपनीतील सहा जण सहलीसाठी उक्षी धबधब्यावर गेले होते. सकाळी धबधब्यावर पोहोचल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहा जण इको कारने जयगड येथे माघारी परतत होते. यावेळी उक्षी गावातील जुन्या पुलावर ही दुर्घटना घडली. पुलाआधी असलेल्या वळणावर अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून नदीत कोसळली. गाडी नदीत कोसळणार याचा अंदाज आल्याने हेरंबा कदम, अतुल करंदीकर, प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे, पराग परेडकर यांनी गाडीतून उड्या मारत स्वत:चा जीव वाचवला. तर गाडीतील करुणा मूर्ती गाडीसोबत नदीत फेकले गेले. अवघ्या काही सेकंदात गाडी नदीतून वाहत दूरवर गेली. वाचलेल्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली त्यांचा आवाज ऐकून गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. दुर्घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. कारसह बुडालेल्या तरूणाचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here