सिंधुदुर्ग विमान वेळापत्रकावर दृश्यमानतेचा परिणाम

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळ म्हणजेच चिपी विमानतळावरून विमान ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा उड्डाण करते, अशा तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत आणि त्या सत्य सुद्धा आहेत.

यात प्रवाशांचे फार हाल होत आहेत आणि हे रोजचेच दुखणे होऊन गेले आहे. पण याच्या मागे कोणते कारण असावे याची माहिती घेतली असता चिपी विमानतळाची कमी असलेली दृश्यमानता यासाठी कारणीभूत असल्याची बाब समोर येतेय. याला काही सूत्रांनी अधिकृत दुजोरा सुद्धा दिला आहे. दरम्यान ज्या आयआरबी कंपनीने हे विमानतळ बांधले आहे त्यांनी पुरेशा सोयीदेखील विमानतळासाठी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात गोव्यातील मोपा विमानतळ सुरु झाल्यास चिपी विमानतळ बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळ सुरु झाला आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा अजून एक अध्याय लिहिला गेला. केंद्राच्या उडान योजनेतून ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून हा विमानतळ विकसित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने विमानतळ सुरु झाल्यामुळे पर्यटनाला देखील हि बाब पोषक आणि पूरक ठरली. आयआरबी कंपनीने हा विमानतळ विकसित केला आहे. त्यांनतर डीजीसीएने अनेक चाचण्या घेल्यावर हा विमानतळ सुरु करायला परवानगी दिली. त्यांनतर सुरुवातीला अलायन्स एअर कंपनीने या ठिकाणाहुन चिपी ते मुंबई आणि परत अशी सेवा सुरु केली. गेले सहा महिने ही सेवा सुरु आहे.

हि सेवा सुरु होऊन आज ६ महिने होऊन गेले आहेत. या सेवेसाठी प्रवासी देखील पुरेसे असतात. उडान योजनेखाली असल्याने ७० पैकी ३५ तिकिटे रु. २५००/- च्या घरात आहेत. त्यांनतर कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे तिकीटदर आकारले जातात. सर्वात जास्त तिकीटदर १८ हजार ५०० च्या घरात गेलेला आहे.बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मुंबईहून सकाळी ७.४० वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी ९.२५ वा. चिपी विमानतळावर उतरते तर पुन्हा सकाळी ९.५५ वा. मुंबईसाठी उड्डाण करते. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे विमान दुपारी १.२५ वा. चिपी विमानतळावर उतरते आणि पुन्हा मुंबईसाठी १.५० वा. उड्डाण करते.

पण असे असले तरी गेल्या काही दिवसापासून चिपीहून विमान उड्डाणाला उशीर होतोय. विशेषतः ९.५५ चे विमान सकाळी ११ च्या पुढेच उड्डाण करते. किंवा मुंबईहून येणारे विमान उशिरा लॅन्ड होते. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. विमान वेळेपूर्वी २ तास अगोदर प्रवाशांसाठी कॉल टाइम असतो. त्यामुळे ८ वाजेपर्यंत चिपी विमानतळ गाठावे लागते. साहजिक जर ११ वाजल्यानंतर विमान उड्डाण झाले तर ८ वाजता आलेला प्रवासी वैतागतो. त्याला त्रास होतो.

याशिवाय विमानतळावर कोणत्याही प्रकारची उपहारगृहाची सोय नाही. ज्येष्ठ नागिरक, महिला, लहान मुले आणि मुख्य म्हणजे मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्यांचे भुकेमुळे हाल होतात. वास्तविक ज्यांनी विमानतळ बांधला त्या आयआरबी कंपनीने याची व्यवस्था केली पाहिजे होती. पण तशी सोय चिपी विमानतळावर नाही. याबाबत प्रवाशांनी तक्रार सुद्धा नोंदवली आहे. पण त्याची दखल आयआरबी किंवा संबंधीत विमानतळ प्रशासनाने अजून घेतलेली नाही. तसेच विमानांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने प्रवाशांना आणण्यासाठी किंवा सोडण्यासाठी जी खासगी वाहने आलेली असतात त्यांचा वेळ फुकट जातो.

विमानांना उशीर का होतो यामागची करणे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट समोर आली कि, चिपी विमानतळाची दृश्यमानता फार कमी आहे. साधारण विमाने उड्डाण करण्यासाठी किंवा उतारण्यासाठी चिपी विमानतळावर ५ हजार दृश्यमानता आवश्यक आहे, पण ती चिपी विमानतळावर मिळत नाही. त्यामुळे दिवस चढायची वाट बघितली जाते आणि त्यामुळे उशीर होतो.

चिपी विमानतळ हा समुद्र किनारी आहे. समुद्र किनारी ढग खाली असल्याने आणि धुके असल्याने दृश्यमानता कमी मिळते. त्यामुळे धावपट्टी दिसत नाही. जसा दिवस चढत जातो तशी दृश्यमानता वाढते, धावपट्टी दिसते आणि विमान उड्डाण करायला आणि लँड करायला सोपे जाते.

खरेतर हि धावपट्टी बनविताना आयआरबी कंपनीने याचा अभ्यास नक्की केला असणार पण दृश्यमानता वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणे मात्र बसविण्यात कंपनीने टाळाटाळ केल्याचेच दिसून येते आहे. त्याचा परिणाम विमान उड्डाणाच्या वेळेत होतो. प्रवाशांना नाहक त्रास होतो.

अलायन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार विमानाला उशीर होत असेल तर त्या बाबतचा मेसेज आणि ईमेल संबंधित प्रवाशांना पाठवला जातो. पण प्रवाशांचे म्हणणे आहे कि त्यांना विमानतळावर गेल्यावरच समजते कि विमान उशिरा आहे. यात सुद्धा समनव्य असणे गरजेचे झाले आहे.

गोव्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरात सुरु आहे. येत्या एक-दिड वर्षात मोपा विमानतळ सुरु होईल. खूप मोठा परिणाम चिपी विमानतळावर होणार आहे. चिपी विमानतळावर जर अशी परिस्थिती असेल तर मग या विमानतळावर कोणी विमानाने येईल का ? प्रवासी येथे उतरतील का ? असे झाले तर चिपी विमानतळाचे महत्व कमी होईल. परिणामी प्रवासी नाहीत म्हणून हा विमानतळ भविष्यात बंद पडण्याची देखील शक्यता आहे. म्हणूनच आयआरबी कंपनीने धावपट्टीवर आवश्यक उपकरणे बसवावीत जेणेकरून दृश्यमानता योग्य होईल. विमाने वेळेत येतील आणि जातील. तसेच विमानतळ इमारतीत वातानूकुलीन यंत्रणा बंद आहे. उपहारगृह नाही या सोयी सुविधा देखील सुरु करणे गरजेचे आहे. शेवटी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने, प्रशासनाने या गोष्टी तातडीने उभ्या कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून आणि सिंधुदुर्गवासीयांकडून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 22-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here